Babasaheb Ambedkar on Savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्पर संबंधांविषयी मी तरुण भारत मध्ये एकूण तीन लेख लिहिले ते येथे सलग देत आहे
-----------------------
स्वा. सावरकर आणि डॉ. आंबेडकर -१
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राकडून भारतीयांना लाभलेली दोन समकालिन नररत्ने. सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील वैचारीक देवघेवीविषयी मात्र खुद्द महाराष्ट्रातच बरेचसे अज्ञान आणि विपर्यास आहे. सावरकर आणि आंबेडकर यांची एकमेकांत भेटच झाली नाही इथपासून जणु काही सावरकर आणि आंबेडकर दोघेही एकाच विचारपठडीतले नेते इथपर्यंत दोन टोकांची मांडणी केली गेली आहे.
सावरकर आणि आंबेडकरांची भेटच झाली नसावी असा समज पसरवण्यात मुख्यत: श्री. रावसाहेब कसबे नावाचे एक लेखक कारणीभूत आहेत. त्यांचे एक पुस्तक साधारण १९९२ साली येऊन गेले त्यात तर त्यांनी रत्नागिरीत सावरकर स्थानबध्द असताना सावरकरांनी वारंवार आमंत्रणे पाठवूनही आंबेडकरांनी सावरकरांची भेट टाळली असा पवित्रा घेत आंबेडकर सावरकरांपासून मुद्दामच अंतर ठेवत होते असा डोलारा उभा केला आहे.
यानंतर याच श्री. कसबे यांची श्री. निखिल वागळे या पत्रकाराने साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ च्या सुमारास एक मुलाखत घेतली. या मुलाखतीतही सावरकर व आंबेडकरांची कधी भेटच झाली नाही असा प्रेक्षकांचा गैरसमज व्हावा, आणि जणु काही दोघांत वैर होते अशी समजूत व्हावी असा प्रयत्न कसबे व वागळे यांनी केला आहे. ही मुलाखत युट्युब वर उपलब्ध होती आणि अजूनही असेल. यात कसबे यांनी सावरकरांविषयी अनेक विपर्यस्त निष्कर्ष काढले आहेत. जो तो आपापल्या आकलनाप्रमाणे निष्कर्ष काढायला मोकळा आहे. पण किमान असे निष्कर्ष सत्याधारीत असावेत. त्याविषयी आपण नंतर सविस्तर चर्चा करुच. पण तत्पुर्वी सावरकर-आंबेडकर यांची आयुष्यात कधी भेटच झाली नाही का या शंकेचे निरसन करु. दुर्दैवी योगायोगाने सावरकर-आंबेडकर यांचे एकत्रित असे एकही छायाचित्र न निघाल्याने दोघांची भेट आयुष्यात कधीच झाली नाही असा विपर्यास करणाऱ्या अशा वैचारीक दहशतवादी मंडळींचे फावले आहे.
राजकीय भेटी आणि मित्रत्वाच्या भेटी
आचार्य कै. बाळाराव सावरकर यांनी आपल्या साधार आणि ससंदर्भ लिहिलेल्या चार खंडात्मक सावरकर चरित्रात दिलेल्या माहितीवरुन या दोन्ही महापुरुषांच्या राजकीय संबंधांवर आणि वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंधांवर बराच प्रकाश पडतो.
सावरकर-आंबेडकरांच्या काही भेटी व सहकार्य प्रसंग/दिनांकवार किंवा स्थानानुसार पुढील प्रमाणे,
१. ऑगस्ट १९२९ मधे डॉ. आंबेडकर एका न्यायालयीन कामासाठी रत्नागिरीला येणार होते. विठ्ठलमंदिरात सावरकरांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे भाषण करायचे ठरले. ही कल्पना त्याकाळात राबवणे अत्यंत कठीण होती. सावरकर अनुयायांनी यासाठी शेकडॊ सह्या जमवल्या. त्यावर सर्व जातीच्या लोकांच्या सह्या व अंगठे ! मात्र आंबेडकरांना तातडिने मुंबईला जावे लागल्याने हे भाषण झाले नाही. मात्र त्या ठिकाणी दोघांची अर्धा तास भेट झाली. विरोधकांनी सावरकरांना तुम्ही आंबेडकरांना भाषण करु देण्यासाठी ५०० सह्या गोळा केल्यात आम्ही ५००० सह्या विरोधात गोळा करु असे सांगितले. अस्पृश्यता निवारणाचे काम त्यावेळी किती दुर्घट होते ते यावरुन लक्षात येते. (सावरकरांच्या सहवासात भाग-एक आ.ग. साळवी, आणि रत्नागिरी पर्व पृ. १९७)
२. २८ जाने १९३९ ला दादर येथे निवडणुक सभेत सावरकर आणि आंबेडकर या दोघांनीही एकाच व्यासपीठावरुन भाषण केले. दोघांनीही श्री. रामभाऊ तटणीस यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत मते द्यावे असे एकत्रित आवाहन केले. सावरकर-आंबेडकर यांच्या एकत्रित झालेल्या सभेत अध्यक्षस्थानी बॅ.जम्नादास मेहता हे होते. (हिंदुमहासभा पर्व १ पृ.१८०)
३. दि. ५ मे १९३९ साध्यानुकूल सहकार (Responsive Co-Operation) या आपल्या धोरणाला अनुसरुन लंडनमधील भारतमंत्र्यांचे समादेशक आणि मध्य प्रांताचे माजी राज्यपाल डॉ. श्री. राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ हिंदुमहासभेने दिलेल्या उपहाराच्या कार्यक्रमात उपस्थित राहीले. या समारंभाला पालिका आयुक्त श्री. भट व हिंदुसभेच्या इतर सर्व नेत्यांसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुध्दा उपस्थित होते. या प्रसंगी सावरकर म्हणाले, आजच्या परिस्थितीत हिंदुंचे प्रतिनिधी होण्यास डॉ. राव सर्व दृष्टीने योग्य आहेत. भारतासमोर लवकरच संघराज्य, महायुद्ध आदी महत्वाचे प्रश्न उपस्थित होणार आहेत . त्या प्रसंगी डॉ.राव हिंदुहिताच्या दृष्टीने मत देतील असा विश्वास वाटतो." यास डॉ. राव यांनी सकारात्मक पाठिंबा दर्शवला. सावरकरांनी राजकारण करताना "साध्यानुकूल सहकार्य" हे धोरण स्वीकारले होते. म्हणजे जिथे जिथे साध्य एक असेल तिथे तिथे अन्य काही बाबतीत मतभेद असले तरी ही त्या मुद्द्यापुरते सहकार्य, या धोरणास अनुसरुन असलेल्या समारंभात डॉ. आंबेडकरांची सावरकरांबरोबरची उपस्थिती लक्षणीयच म्हणावी अशी होती. हिंदुहित हे सावरकरांचे सर्वात प्राधान्य असलेले साध्य होते. (हिंदुसभा पर्व १ पृ. २१५-२१६)
४. सोमवार दि. ९ ऑक्टोबर १९३९ ला सकाळी ११ ते १२ एक तास सावरकर व व्हाईसरॉय यांची भेट. सावरकरांच्या अथक प्रयत्नांमुळे आधी राजकारणात सहभाग न घेण्याचे कलम आपल्या उद्दीष्टांमध्ये असलेली हिंदुमहासभा दोन वर्षांतच कॉंग्रेसच्या हिंदुहितविरोधी आणि मुस्लिम तुष्टीकरणनीतीला विरोध करत एक महत्वाचा राजकीय पर्याय म्हणून उभा रहात होता आणि कॉंग्रेस आणि मुस्लीम लीग प्रमाणेच एक महत्वाचा पक्ष म्हणून मान्यताप्राप्त होऊ लागला होता. हिंदुपक्षाचे म्हणणे काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉईसरॉय कॉंग्रेस नेत्यांप्रमाणेच सावरकरांशीही स्वतंत्रपणे भेटीगाठी घेऊ लागले होते. या भेटीहून बाहेर आल्यावर तिथेच व्हाईसरॉयच्या भेटीसाठी आलेल्या डॉ.आंबेडकरांशी सावरकरांची भेट झाली. तिथेच काही वेळ सावरकर व आंबेडकर यांच्यात गप्पागोष्टी झाल्या. या भेटीत व्हाईसरॉयने कॉंग्रेस व मुस्लीम लिग प्रमाणेच हिंदुमहासभेलाही वाटघाटींसाठी निमंत्रण देण्याचे मान्य केले.(हिंदुसभा पर्व १ पृ. २७६)
५. यानंतरची सावरकर आंबेडकर यांची भेट १३ जानेवारी १९४० ला सावरकरांच्या घरीच झाली. सावरकर सदन या नावाने सावरकरांचे दादर मधील घर आजही प्रसिध्द आहे. या प्रसंगी सावरकरांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून ते घरीच राहून कार्यालयाची कामे पहात होते. त्यावेळी डॉ. आंबेडकर आणि आचार्य दोंदे हे दोघेही सावरकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास सावरकर सदन मध्ये येऊन भेटले. हिंदुंवर सीमाप्रांतात होणार्या आक्रमणांचा प्रतिकार कसा करावा यासंबंधात सावरकरांनी प्रकृती अस्वास्थ्य बाजूला ठेऊन ९ जाने १९४० ला रामभाऊ तटणीस यांच्याशी चर्चा केली होती. या भेटीनंतर जीना-सावरकर यांच्यातील भेटीचीही चर्चा सुरु झाली. पण या वार्तेत तथ्य नसल्याचे "केसरी" ने प्रसिद्ध केले. मी हिंदुंचा प्रतिनिधी असून मला जीनांकडे काहीही मागायचे नाही, त्यांना हवे असल्यास त्यांनी माझ्याकडे यावे अशी सावरकरांची भूमिका होती. राजकारणात कोण कोणाला भेटतो याला खूप अर्थ असतो. गांधी जसे जीनांकडे हेलपाटे मारतात तसे आपण कदापी करणार नाही अशी सावरकरांची भूमिका होती. सावरकर- आंबेडकर यांच्यात मात्र मित्रत्वाच्या भेटीगाठी होत होत्या हे आतापर्यंत दिलेल्या दिनांकवार माहितीवरुन सहज लक्षात येईल. (हिंदुसभा पर्व -१ पृ. ३०४)
६. यानंतर सावरकर-आंबेडकरांच्यातील पुढील भेटीचा दिनांक बाळाराव सावरकरांनी नोंदवला आहे तो ६ फेब्रुवारी १९४०. या दिवशी पारशी समाजाची एक सभा झाली. त्या सभेला सावरकर उपस्थित राहीले. जीनांना न भेटणारे सावरकर अत्यल्पसंख्य पारशी समाजाशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध राखून होते. या सभेला स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे बंधु डॉ.नारायणराव सावरकर यांच्यासोमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरही सावरकर बंधुंसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहीले. सावरकर- आंबेडकर आणि विविध पारशी नेते आणि हिंदुमहासभेचे पुढारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, "कोणत्याही राष्ट्रीय कार्यात नि राज्यकारभारात अल्पसंख्य जमातींना योग्य तो वाटा देण्यास हिंदुमहासभा सिद्ध आहे. आज कॉंग्रेसचे निवडून गेलेले प्रतिनिधी अधिक आहेत हे खरे, पण हिंदुमहासभेचे अनुयायी आणि सभेला पाठींबा देणारे त्यांच्याहून अधिक आहेत. मुसलमानांना आता हिंदुस्थान हिंदुंचा आणि मुस्लिमांचा असे देशाचे दोन तुकडे करायचे आहेत. इतर अल्पसंख्यांकांनी हिंदुस्तान तोडण्याच्या मुसलमानांच्या मागणीशी गट्टी करु नये. याच सभेत सावरकरांप्रमाणेच डॉ. आंबेडकरांनीही भाषण केले. (सकाळ ७-२-१९४०) या सभेचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया मध्येही छापून आले होते. यापूर्वी २२ जाने. ला सावरकरांनी पारशी समाजाच्या नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केली होती. २५ जानेवारी १९४० ला सावरकर आणि सेनापती बापट यांनी पुन: पारशी नेत्यांशी चर्चा केली होती. (हिंदुसभा पर्व -१ पृ .३०८-३०९)
श्री. प्र. के. अत्रे या काळात गांधी-कॉंग्रेस भक्त आणि सावरकरांचे कट्टर विरोधक होते. त्यांनी नवयुग मधुन सावरकर-आंबेडकर यांच्यातील एकत्र येऊन राजकारण करण्यावर सडकून टिका केली. (हि.स. पर्व १ पृ. ३११) त्या वर्षी झालेल्या निवडणुकात हिंदूसभा, सनातनी, आर्यसमाजी व आंबेडकरांच्या स्वतंत्र श्रमिक पक्ष व Liberal पक्ष या सर्वांनी एकमेकांना जमेल तेवढे सहकार्य करुन निवडणुका लढवल्या व बहुतांशी ठिकाणी त्यांचा विजय होऊन कॉंग्रेसचा पाडाव
झाला. यावर हिंदुविघातक कॉंग्रेसचा पाडाव शक्य आहे हे या निवडणुकांनी दाखवून दिले अशी सावरकरांनी प्रतिक्रीया दिली. (हिं.स.प.१ पृ. ३२०)
७. सावरकर आणि आंबेडकरांची पुढील भेट १७ एप्रिल १९४० च्या सुमारास चुनीलाल मेहता यांच्या घरी झाली. चुनीलाल यांच्या घरी भरलेल्या कॉंग्रेसेतर पक्षांच्या या सभेला स्वा.सावरकर, डॉ.आंबेडकर तसेच रँगलर र.पु.परांजपे उपस्थित होते. या सभेत एक कॉंग्रेस विरोधी आघाडी निर्माण करावी यावर चर्चा करण्यात आली. (हिं.स.पर्व-१- पृ. ३२८)
८. दि.१४-१५ मार्च १९४१ ला मुंबईत ताजमहाल हॉटेल मध्ये कॉंग्रेस व मुस्लीम लीग वगळून अन्य पक्षांची बैठक भरली. त्यात सुमारे चाळीस नेते उपस्थित होते. हि एक अतिशय महत्वाची बैठक असून यात सावरकरांचा अत्यंत महत्वाचा सहभाग होता. आंबेडकरही सावरकरांसमवेत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला विशेष मार्गदर्शन सावरकरांनी केल्याने त्यांचा आभाराचा विशेष उल्लेख अध्यक्ष बॅ.सप्रू यांनी केला. या काळात ब्रिटनचा द्वितीय विश्वयुध्दात सर्वत्र सारखा पराभव होत होता. या परिषदेने अनेक ठराव संमत केले, युध्द संपताच ब्रिटनने हिंदुस्थानला वसाहतीचे स्वातंत्र्य त्वरीत द्यावे ही मागणी करण्यात आली. या परीषदेवर सावरकरांचा मोठा प्रभाव पडला. या परिषदेचे प्रतिवृत्त टाईम्स ऑफ इंडिया २६ मार्च १९४१ ला प्रसिध्द झाले असून हे ठराव जर प्रत्यक्षात अले तर ब्रिटीशांच्या संरक्षणाखाली हिंदुराज्यच स्थापन होईल असा संताप टाईम्स ने व्यक्त क तर या परिषदेवर कोणत्या कवी कालिदासाचा हात फिरला आहे असा सवाल फ्री प्रेस जर्नलने केला.(अखंड हिंदुस्थान लढा पर्व पृ.१८-१९) या परिषदेनंतर जीना सावरकरांना भेटण्यास उत्सुक असल्याच्या वार्ता झळकत होत्या. आंबेडकरही सावरकर जीना भेट व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. ती भेट मात्र शेवटपर्यंत झालीच नाही.
९. सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांचे हिंदु मुस्लीम समस्येविषयी एकमत होते. पण समस्या कशी सोडवावी या विषयी खूप मोठी मतभिन्नता होती. त्याविषयी सविस्तर चर्चा करुच. पण त्याच सुमारास आंबेडकरांचे 'पाकिस्तान' अर्थात भारताची फाळणी हे पुस्तक प्रसिध्द झाले. या पुस्तकासंबंधी मद्रास येथील हिंदूच्या वार्ताहरांनी सावरकरांना प्रश्न विचारले. ती प्रश्नोत्तरे व वृत्त हिंदुच्या २८ फेब्रुवारी १९४१ च्या अंकात प्रसिध्द झाली. यावेळी सावरकर म्हणाले, हे पुस्तक प्रसिध्द करताना डॉ. आंबेडकरांनी आपल्याशी चर्चा केली होती. यावरुन सावरकर आणि आंबेडकरांच्या आणखीही न नोंदलेल्या भेटीगाठी होत असत असे दिसते.
१०. दि.२६ जुलै १९४१ ला ७५ पुढार्यांची पुण्यात बैठक झाली त्या परिषदेत सावरकरांचे वैशिष्ट्यपूर्ण भाषण झाले. यावेळी डॉ. राधाकृष्णन, बॅ. जयकर, सर विश्वेश्वरय्या, मिर्झा इस्माईल, सप्रू अशा इतर अनेक पुढाऱ्यांबरोबर आंबेडकरांचीही उपस्थिती होती. या परिषदेला दुपारी गोखले सभागृहात प्रारंभ झाला. सावरकर मुंबईहून सभास्थानी पोचताच सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. (अखंड हिंदुस्थान लढा पर्व पृ. १३६) ही परिषद संपल्यावर सावरकर पुढे सांगली येथे गेले. सांगली स्थानकावर सहस्त्रावधी लोक सावरकरांच्या स्वागताला उभे होते.
११. दि.११ एप्रिल १९४३ ला सावरकर दिल्लीत होते. त्यावेळी त्यांनी हिंदुसभाभवनात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. हिंदुमहासभा पक्षांतर्गत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर व्हाईसरॉयच्या कार्यकारणीचे एक सदस्य असल्याने त्या संदर्भात सावरकरांनी डॉ.आंबेडकरांशी एक तास विचारविनिमय केला. (अ. हिं. लढा पर्व पृ. १९४)
या सर्व ससंदर्भ माहितीवरुन सावरकर-आंबेडकर कधी भेटच झाली नाही हा अपप्रचार आणि त्यावर दोघांमधील विरोधाचा काल्पनिक डोलारा उभे करणे किती चुकीचे आहे हे सहज लक्षात येईल. निश्चितपणे दोघांमध्ये काही विषयात सहकार्य असले तरी मतभेदही होते. पण ते त्याच पातळीवर चर्चा करुन समजून घेतले पाहीजेत, अपप्रचार करुन नाही. असो. पुढील लेखात सावरकर-आंबेडकर यांच्यातील वैचारीक साम्यस्थळे आणि वैचारीक मतभेद यांचा आढावा घेऊ.
-----------------
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर आंबेडकर भाग-2
सावरकर आणि आंबेडकर ही दोन नररत्ने महाराष्ट्राला लाभली. यांच्यात जशा भेटीगाठी होत मित्रत्वाचे संबंध होते त्याच बरोबर काही बाबतीत सहकार्य होते तसेच काही बाबतीत मतभेद सुद्धा होते. एकमेकांविषयी आदर होता तसाच एकमेकांवर कडक टीकासुद्धा करत असत. आणि तसे असणे स्वाभाविक होते. दोघांची जी समान आणि ठळक कार्यक्षेत्रे आहेत ती स्थूलमानाने पुढीलप्रमाणे:
1. सामाजिक क्षेत्र 2. राजकीय क्षेत्र 3. मुस्लीम प्रश्न ४. देशाचे अखंडत्व किंवा फाळणी 5. धर्मांतर
सामाजिक क्षेत्र: सावरकरांच्या समाज प्रबोधनामध्ये संपूर्ण हिंदू समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवणे, सर्व जाती-जमातीतील हिंदूंचे संघटन, अस्पृश्यता निवारण अशा अनेक अंगांचा समावेश होता. त्यांच्यासमोर मुख्यतः संपूर्ण हिंदू समाजाचे प्रबोधन, उद्बोधन हे उद्दिष्ट होते.
आपल्या हिंदु समाजाची एकूण रचना अशी आहे की एखाद्या जातीविषयी बोलायचे झाले तर बोलणारी व्यक्ती त्याच जातीत जन्माला यावी लागते. अन्यथा ती करत असलेल्या प्रबोधनाकडे, चांगल्या सूचनांकडे ती जात संशयाने पाहते. त्यामुळे सावरकरांनी कधीही पूर्वास्पृश्यांचे नेतृत्व कोणाकडूनही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या नेतृत्वाचा परीघ कोणती एक जात किंवा जातींचे गट नसून संपूर्ण हिंदू समाज हाच त्यांनी निश्चित केला होता. व्यापक हिंदूसमाजाचे नेतृत्व त्यांना करायचे होते. मात्र या हिंदुंमध्ये समान पातळीवर बंधुत्व असल्यावाचून या हिंदु संघटनाला आणि राष्ट्रवादाला अर्थ नव्हता आणि यशही मिळणार नव्हते. सावरकर म्हणत, न्यायासाठी, मानवतेसाठी, समतेसाठी आणि बंधुत्वासाठी अशा सर्वच कारणांनी अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. हिंदुसमाजातील दुफळीच्या कारणांना सावरकरांनी सप्तबेडया असे नाव दिले आणि त्या नष्ट करण्याचा चंग बांधला. स्पर्श बंदी मोडणे म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे, रोटी बंदी मोडणे म्हणजे एकमेकांनी शिजवलेले अन्न विनासंकोच सोवळ्याओवळयाच्या कल्पना त्याज्य मानून सेवन करणे, त्यासाठी सावरकरांनी सहभोजनांचा धूमधडाका महाराष्ट्रात उडवून दिला. बेटी बंदी मोडणे म्हणजे हिंदुंमध्ये आंतरजातीय विवाह करणे. सावरकरांनी स्वत:च असे पंधरा वीस आंतरजातीय विवाह घडवून आणले होते. देवदर्शनबंदी, शुध्दी बंदी , समुद्र बंदी आणि व्यवसाय बंदी या सर्व बंदी सावरकरांनी प्रत्यक्ष मोडल्या. चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचना नष्ट करण्यावर दोघांचेही एकमत होते.
डॉ. आंबेडकरांना सावरकरांचा सप्तबेड्या मोडण्याचा कार्यक्रम मान्य होता. सावरकरांना स्थानबद्धतेमुळे रत्नागिरी सोडणे शक्य नसले तरी महाडचा सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदीराचा असो सावरकरांनी आणि सावरकर अनुयायांनी आंबेडकरांना त्या सर्व लढ्यात खुल्यादिलाने साथ दिलेली दिसते. स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर आपल्या अनुयायांबरोबर त्या लढ्यात होते. डॉ. सावरकर काळाराम मंदीराच्या सत्याग्रहात कसे होते यावर आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी चांगला प्रकाश टाकला आहे.
देवदर्शनाचा हक्क पूर्वास्पृश्यांना मिळावा म्हणून सावरकर जागरुक होतेच. सर्व हिंदुंसाठी दर्शनास खुले असलेले पतितपावन मंदीर त्यांनी शेठ भागोजी कीर या सुधारक धनिकाकडून बांधून घेतले ते आता बहुतेकांस माहिती आहेच. मात्र या पतितपावन मंदीराविषयी काही अभ्यासकांचा प्रामाणिक किंवा अप्रामाणिक गैरसमज आहे की ते केवळ पूर्वास्पृश्यांसाठी बांधलेले स्वतंत्र मंदीर आहे.
पतित पावन मंदीर हे अस्पृश्यांसाठी बांधलेले वेगळे मंदिर नव्हते तर सर्व हिंदूंसाठी बांधलेले होते. त्या पतित-पावन मंदिराच्या आधी सावरकरांनी रत्नागिरीतील प्राचीन विठ्ठल मंदिर लढा देऊन सर्वांसाठी मुक्त केले. इतकेच नव्हे तर त्या सर्व जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे जुनी मंदिरे सावरकरांनी सर्व हिंदूंसाठी मुक्त करवली. अस्पृश्यांसाठी वेगळी आणि नवीन मंदिरे बांधणे हे निश्चितच चुकीचे होते. त्याकाळी काहीजणांनी असा उद्योग केला होता आणि डॉ. आंबेडकरांनी त्याविरुद्ध जुनी मंदीरे खुली न करता नवीन बांधण्यावर टीकासुद्धा केली आहे. परंतु ती टिका सावरकरांना आणि पतितपावन मंदिराला लागू होत नाही. त्याचे कारण सावरकरांनी पतितपावन हे केवळ पूर्वास्पृश्यांसाठी असलेले स्वतंत्र मंदिर उभारले नसून सर्वच हिंदूंसाठी गाभार्यापर्यंत जाऊन दर्शनास मुक्त असलेले नवे मंदीर उभारले. आणि त्या पुर्वीच जुनी मंदिरेसुद्धा मुक्त केली होती. काही अभ्यासकांनी हा गैरसमज पसरवला आहे की आंबेडकरांनी केलेली नवीन आणि स्वतंत्र मंदिरांबाबतची ही टीका सावरकरांना उद्देशून होती. हा अपप्रचार आहे.
त्यानंतर बऱ्याच काळाने साने गुरुजींनी पंढरपूरचे मंदिर मुक्त करण्याचा जो लढा दिला त्यालाही सावरकरांनी पाठिंबा दिला. स्वतः सानेगुरुजींनीच तशी नोंद केली आहे.
महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनात सावरकर पक्षाचा आंबेडकर यांच्या बाजूने सहभाग होता. त्याविषयी आंबेडकरांचे जनता पत्र म्हणते "चार-पाच घरांखेरीज सर्व महाडकरांनी तळ्याच्या पाण्यावर बहिष्कार घातला आहे. या चार-पाच घरातील लोकांना मात्र रीतसर जाती बहिष्कृत करण्यात आले नाही. सध्या तळ्यातील पाणी भरत असलेल्या घरातील सावरकर पक्षाच्या तरुणांनी शुद्धीला हरकत घेतली. तुम्ही शुद्धी केल्यावर आमच्या घरातील "अशुद्ध" पाणी आम्ही तळ्यात ओतू व पुन्हा "शुद्ध" केल्यावर पुन्हा तसेच करून तुम्हाला सतावून सोडू असे त्यांनी शुद्धीवाल्यांना बजावले व शेवटी सनातनी जांबुवंत रावांना शुद्धीकरणाचा विचार सोडून देणे भाग पडले."
जनता पत्र पुढे म्हणाले की, "सावरकर पक्षाचा यापेक्षाही मोठा विजय श्री विश्वेश्वराच्या सार्वजनिक भोजन समारंभाच्या वेळी झाला. सावरकरपक्षीय तरुणांना आमंत्रण नव्हते. तरी देवाच्या प्रसादासाठी त्या घरातील सावरकर पक्षीय तरुण तेथे उपस्थित होऊन प्रत्येक रांगेत एक एक घुसला.(सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना नष्ट करण्यासाठी). म्हाताऱ्याकोतार्यांची धांदल उडाली. धर्म बुडाला देव भ्रष्ट झाला असा आक्रोश सुरू झाला. तरीही शेवटी एकच पंगत बसली.”
शाळांतून सर्व स्पृश्यास्पृश्य मुलांना सरमिसळ बसवण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर अतिशय दक्ष असत. लहानपणापासूनच अस्पृश्यतेचे संस्कार नष्ट व्हावेत म्हणून ते व त्यांचे सहकारी शाळाशाळांतून अचानक भेटी देऊन तपासणी करत आणि सर्व विद्यार्थ्यांना सरमिसळ बसवले नसेल तर तसे करण्यास भाग पाडत. अस्पृश्यता पाळणाऱ्या सवर्ण शिक्षकांविरुध्द वेळप्रसंगी तक्रारी करुन सावरकरांनी त्यांना शिक्षा देवविल्या. सावरकरांच्या अस्पृश्योद्धाराच्या कामामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बुरसटलेल्या विचारांच्या ब्राह्मण मंडळींमध्ये ते खूपच अप्रिय झाले असे संशोधक य. दि. फडके “शोध सावरकरांचा” मध्ये नोंदवतात. सावरकरांनी अंदमानातसुध्दा कोणताही जातीभेद न पाळता शिक्षणाचा प्रसार केला. ते अंदमानात असताना अनेक कैदी शिकून साक्षर झाले. डॉ. आंबेडकरांनी तर शिक्षणसंस्थांची स्थापना करुन खूप मोठे कार्य शिक्षण क्षेत्रात करुन ठेवले आहे.
सुरुवतीला डॉ. आंबेडकर जानवी, वेद यांचे अधिकार मागत होते. सावरकरांनाही ते मान्यच होते. सन १९२९ साली मालवण येथे जी सर्व जातींच्या पुर्वास्पृश्यांची परिषद झाली, त्यात सर्वांनी एकमताने सावरकरांची अध्यक्ष म्हणून निवड केली. त्याप्रसंगी सावरकरांनी जमलेल्या सर्व पुर्वास्पृश्य़ांना यज्ञोपविते देऊन वेदोक्त बंदीसुध्दा ओलांडली होते.
राजकीय क्षेत्र : सावरकर आणि आंबेडकर दोघेही काही समान तर काही भिन्न कारणांनी राजकारणात कॉंग्रेस विरोधी होते. आणि दोघांनीही एकत्र येऊन कॉंग्रेसविरुध्द एकत्र लहानमोठया निवडणुका लढवल्या काही जिंकल्या, काही निवडणुकांत पराभूत झाले. काही प्रसंगी दोघांनी एकाच उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्या उमेदवाराचा प्रचारही एकाच व्यासपीठावरुन केला. त्याचे संदर्भ कै. आचार्य बाळाराव सावरकरांनी लिहिलेल्या सावरकर चरित्र खंडात दिले आहेतच. सैनिकीकरण, गांधीजींच्या आत्यंतिक अहिंसेला विरोध याविषयी दोघांच्या भूमिका समान होत्या तर सन १९४२ च्या चळवळीला दोघांचाही विभिन्न कारणांनी तत्वत: विरोध होता.
१९५२ च्या निवडणुकीत सावरकरांनी साध्यानुकूल सहकार्य आणि हिंदुसमाजाचे हित या गोष्टी ध्यानात घेऊन जेथे हिंदुसभेचे इच्छुक नाहीत तेथे जनसंघाला किंवा काँग्रेसमधील काही हिंदुत्वनिष्ठांनाही पाठिंबा द्यावा, असे धोरण ठेवले. मुंबईमध्ये त्यावेळी लोकसभेच्या राखीव जागांसाठी डॉ. आंबेडकर विरुद्ध काँग्रेसचे श्री. नारायणराव काजरोळकर असा सामना होता. या सामन्यात सावरकरांनी हिंदुधर्माचा त्याग करण्यास कटीबद्ध झालेल्या डॉ. आंबेडकरांना मते न देता हिंदुत्वनिष्ठांनी धर्मनिष्ठ श्री. काजरोळकरांना मते द्यावीत, असा संदेश दिला होता.
अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लालेस लीग ही पूर्वास्पृश्यांची एक प्रातिनिधीक नि प्रमुख संस्था होती. ती हिंदुत्वनिष्ठ असल्याने सावरकरांचा त्यांना पाठींबा होता. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची एक महत्वाची बैठक झाली. भारतीय लोकसभेचे सदस्य डॉ. धर्मप्रकाश त्या बैठकीचे अध्यक्ष होते. पंजाबचे श्रमिक मंत्री श्री. पृथ्वीसिंग, उत्तर प्रदेशचे मंत्री गिरिधारी लालजी, मध्यप्रदेशचे मंत्री अग्निभोज, मद्रासचे मंत्री परमेश्वरन, मुंबईचे मंत्री गणपतराव तपासे, नारायणराव काजरोळकर, एम. एल. ए. सोनावणे, एम. पी. इत्यादी पूर्वास्पृश्यांचे अखिल भारतीय पुढारी नि प्रमुख राज्याधिकारी उपस्थित होते.
ह्या डिप्रेस्ड क्लास लीगचा दूरदर्शी, हिंदुत्वनिष्ठ, निडर नि खणखणीत असा ठराव जो होता, त्यात कार्यकारिणी म्हणते, " आमच्या (पू्र्वास्पृश्य) बंधुभगिनींना आमची अशी विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही कारणासाठी आपला प्राचीन धर्म सोडू नये. प्रसंगपरत्वे ज्यांनी स्वधर्म सोडला असेल त्यांनी शक्य तितक्या लवकर आपल्या प्राचीन स्वधर्मात परत यावे. या देशाच्या अनेक भागांत काही काही जमाती आपली लोकसंख्या वाढविण्यासाठी इतरांना बाटविण्याचा प्रयत्न करीत असतात. ही कार्यकारिणी अशा कारवायांविषयी अत्यंत तीव्र विषाद व्यक्तवीत आहे.’’आपल्या धर्मातून बाटून परधर्मात गेलेल्यांना स्वधर्मात परत घेण्यासाठी आमच्या हिंदु बांधवांनाही शक्य ते ते सहाय्य करावे. अशी आमची यच्चयावत हिंदुमात्राला विनंती आहे.’’
“आमच्या पूर्वास्पृ्श्य बंधूंच्या या कळकळीच्या विनंतीविषयी आम्हास इतके तरी सांगितल्यावाचून पुढे जाववतच नाही की, धर्मबंधूंनो, हिंदू धर्मरक्षणाच्या कार्यी तुम्हास सहाय्यच नव्हे तर तुमच्या खांद्याशी खांदा लावून झुंजण्याची, सहकार्य करण्याची तुमच्या इतर हिंदू बांधवांना आज्ञा करण्याचा तुम्हास अधिकार आहे, केवळ विनंती नव्हे आणि ती पाळण्याचे त्यांचे कर्तव्य आहे. पुन्हा हेही ध्यानात असावे, की जे आपले धर्मबंधू बळाने वा छळाने, अनिच्छेने वा भ्रांत इच्छेने पूर्वी परधर्मात गेले त्यांना आपल्या हिंदुधर्मात परत येण्यास आता त्यांच्या इच्छेविना दुसरी कोणताही आ़डकाठी राहिलेली नाही. अगदी जन्मजात असा सहस्त्रावधी मुसलमानांनासुद्धा, त्यांनी आम्ही हिंदू होऊ इच्छितो, असे म्हणताच, राजपूत-जाटासारख्या कट्टर हिंदूंनीही नुसत्या शेंडीवारी शु्द्ध करून घेतले. समाजात सामावून टाकले. ही डोळ्यादेखत घडत असलेली उदाहऱणे आहेत. पूर्वास्पृश्य हिंदू बांधवांना आपल्या पूर्वाजार्चित हिंदू धर्मात येण्याची इच्छा होण्याचा काय तो अवकाश आहे, आता अस्पृश्यतेची बेडी तुटली आहे. शुद्धीचे महाद्वार सताड उघडलेले आहे. गंगामाईचे पाणीसुद्धा शुद्धीसाठी शिंपडणे अवश्यक नाही. आपल्या घरी परत येऊन आपल्या अंतरलेल्या धर्मबंधूंना मायलेकरांना भेटताच नि राष्ट्रीय आनंदाचे अश्रू तुमच्या आमच्या डोळ्यातून वाहतील त्यांचे जे सिंचन तीच शुद्धी तेवढाच काय तो संस्कार.’’
अशा विचारांच्या नारायणराव काजरोळकर यांना निवडणुकीत पाठिंबा देऊन सावरकरांनी आपला धर्मांतराला असलेला विरोध आणि हिंदुत्ववादी भूमिका परत अधोरेखित केली. आंबेडकरांचे धर्मांतर हाच हिंदुत्वनिष्ठ समाज क्रांतीकारक सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मुख्य मतभेद होता. पाकिस्तान निर्मिती आणि धर्मांतर या अनुषंगाने सावरकर-आंबेडकर यांच्या भूमिका पुढे पाहू.
--------------------------
सावरकर आणि आंबेडकर भाग ३
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील राजकीय बंधने उठली व त्यांची ब्रिटीशांनी दिलेल्या शिक्षेतून पूर्णत: मुक्तता झाली ती इ.स. १९३७ मध्ये! त्यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा लढा परम शिगेला पोचत होता, पण त्यातील ब्रिटीशांविरुद्ध लढणे या भागाचा प्राधान्यक्रम बदलला होता व मुख्य प्रश्न निर्माण झाला तो आगामी स्वातंत्र्याचे वाटप हिंदु मुसलमानांमध्ये कसे करावे याचा. हिंदु-मुस्लीम ऐक्यावाचून स्वराज्य नाही ही गांधीजींची प्रथमपासूनच घोषणा होती. ब्रिटीश सुध्दा म्हणत होते की तुम्ही तुमच्यातला हा अंतर्गत प्रश्न मिटवा, दुसरे महायुध्द संपले की आम्ही तुम्हाला त्वरीत वसाहतीचे स्वातंत्र्य देतो. सावरकर मुक्त झाले त्या काळात मुस्लीमांच्या अवास्तव मागण्या आणि हिंदु समाजावर त्यांच्याकडून होणारे हल्ले आणि त्यावर हिंदूंकडून तितक्याच तीव्र पण मंदगतीने उठणाऱ्या प्रतिक्रीया हाच मुख्य प्रश्न निर्माण झाला होता.
मुस्लीम प्रश्नाविषयी बऱ्याच नेत्यांनी आणि विचारवंतांनी चिंतन केले आणि आपापले विश्लेषण व उपाय मांडले. त्या सर्वांमध्ये सर्वात सखोल चिंतन करुन ठोस उपाय मांडणाऱ्यात अग्रभागी होते ते वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर! दोघांचे चिंतन आणि मिमांसा जवळपास एकसारखीच असली तरी दोघांच्याही त्यावरील समस्यापुर्तीच्या उपायांमध्ये टोकाचे अंतर होते.
कॉंग्रेसच्या पायाभरणीतच मुस्लीम पायधरणी कालध्वम (Time Bomb)
मुस्लिम प्रश्नावर सावरकरांनी मुसलमानी आक्रमणे, त्यांच्या चढेल मागण्या, इतिहासात केलेली बाटवाबाटवी, समकालिन घडत असलेली आक्रमणे आणि गांधी प्रणित कॉंग्रेसची बोटचेपी भूमिका यावर सातत्याने लेखन केले. गांधी-कॉंग्रेस आणि गांधीपूर्व-कॉंग्रेस यांनी सातत्याने मुस्लिम तुष्टीकरण करुन मुसलमानी अहंकार कसा जोपासला त्याचा इतिहास त्यांनी मांडला. कॉंग्रेसच्या पायाभरणीतच मुस्लिम पायाभरणीचा कालध्वम या मथळ्याचा इतिहास आपल्या आत्मवृत्त पूर्वपीठीका मध्ये मांडून सावरकर म्हणतात, जसजसे कॉंग्रेस मुसलमानांना ऐक्याचा आग्रह धरु लागले, त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये सामिल व्हावे म्हणून त्यांच्या मागे मागे फिरु लागले तसतसे मुसलमान अधिकच ताठर होऊ लागले, जास्तच आक्रमकपणे अलग राष्ट्रीयत्वाची भावना जोपासू लागले. सावरकरांच्या मते कॉंग्रेसने मुळातच ही हिंदुहिताविरोधी ठरणारी तुष्टीकरणाची भूमिका सोडून द्यायला हवी होती. सावकरांनी हिंदू संघटन, हिंदुंचे सैनिकीकरण, इहवादी हिंदुत्व, विज्ञाननिष्ठा आणि अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मुलन, अहिंदुंचे शुध्दीकरण असा कार्यक्रम यावर सकारात्मक तोडगा म्हणून राबवला. हिंदुस्थान अखंडच ठेऊन सर्व धर्मांना लोकशाही तत्वाप्रमाणे समान दर्जाचे नागरीकत्व पण लोकसंख्येप्रमाणातच प्रतिनिधित्व ही भूमिका त्यांनी घेतली.
आंबेडकरांनीही अतिशय विस्तृतपणे "पाकीस्तान अर्थात भारताची फाळणी" या पुस्तकात मुस्लिमांच्या आक्रमणांपासूनचा सर्व इतिहास मांडला. मुसलमानांच्या मागण्या, त्यांची स्वत:ला धार्मिक आधारावर स्वतंत्र रा?
टिप्पण्या