वाळवी

वाळवी : लाकडातील सेल्युलोज खाणारे हे कीटक उधई (संस्कृत- वल्म )या नावानेही ओळखले जातात. या समाजप्रिय कीटकांचा समावेश आयसॉप्टेरा गणात केला जातो. सामान्यतः ‘पांढऱ्या मुंग्या’ म्हणून ओळखल्या जात असल्या, तरी यांचे खऱ्या मुंग्यांशी निकटचे आप्तभाव नाहीत. खऱ्या मुंग्यांचा समावेश मधमाश्या व गांधीलमाश्या यांच्याबरोबर हायमेनॉप्टेरा या उच्च गणात केला जातो. वाळवीमधील समाजव्यवस्थेचे हायमेनॉप्टेरा गणातील समाजव्यवस्थेशी खूपच साम्य असले, तरी वाळवीचा क्रमविकास (उत्क्रांती) स्वतंत्रपणे झालेला आहे. प्रसार : वाळवीच्या सु. दोन हजार (काहींच्या मते १,९००) जाती असून त्यांचा प्रसार जगभर विस्तृत प्रदेशांत आहे तरीही उष्ण व उपोष्ण कटिबंधांत त्यांच्या जाती व संख्या सर्वात जास्त आहेत. उष्ण कटिबंधातील वर्षावनांत ती विपुल प्रमाणात आढळते व ओसाड प्रदेशात तुलनात्मक दृष्ट्या कमी असते. भारतात तिच्या २६० जातींची नोंद झाली असून २,७४० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात ती सर्वत्र आढळते. उत्तर अमेरिकेत वाळवीचा प्रसार व्हँकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, पॅसिफिक किनारा, पूर्व कॅनडा व मेन येथे आहे. यूरोपात तिचा स्वाभाविक प्र...